Close Visit Mhshetkari

भुईमुग लागवड – तंत्र उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीचे | Peanuts farming

Peanuts farming : शेंगदाणा म्हणजेच भुईमूग याचे वर्गीकरण अराचिस हायपोगिया असे केले जाते. हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक आहे.लहान आणि मोठ्या व्यावसायिक उत्पादकांसाठी ते महत्त्वाचे पीक आहे.कवचयुक्त शेंगदाण्याचे जागतिक वार्षिक उत्पादन 44 दशलक्ष टन होते.ज्याचे नेतृत्व चीन करतो.चीनमध्ये जगाच्या एकूण उत्पादनाच्या 38% उत्पादन होते.

भुईमुग लागवड
भुईमुग लागवड

भुईमुग लागवड

भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक आहे. खरिप हंगामात भुईमुगाखाली क्षेत्र अधिक असते.उन्हाळी  क्षेत्र तुलनेने कमी असूनही भुईमुगाची उत्पादकता अधिक असते.

महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमुगाखालील लागवडक्षेत्र साधारणत: 2.26 लाख हेक्टर, तर उन्हाळ्यात 0.442 लाख हेक्टर एवढे असते. उत्पादन खरिपात 1082 किलो प्रतिहेक्टर असून, उन्हाळ्यात 1451 किलो प्रतिहेक्टर एवढे असते.’भुईमुग लागवड’

चांगल्या उत्पादनासाठी आवश्‍यक बाबी : 

    स्वच्छ सूर्यप्रकाश, सिंचनाची व्यवस्था,जमिनीतील ओलीचे प्रमाण योग्य व प्रमाणशीर असावे.किडरोग नियंत्रण व तणांचा कमी प्रादुर्भाव असावा, योग्य तापमान इत्यादी. 

हवामान :

☀पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान 18° अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असावे.

☀ फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान 24° ते 25° अंश सेल्सिअस लागते नाहितर फुलधारणेवर विपरीत परिणाम होतो.अतिउशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.  

लागवडीसाठी योग्य काळ :

           जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: 90 ते 115  दिवसांचा असतो. बरेच शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामाची योग्य वेळ 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते. 

सर्वोत्तम वाण व प्रमाण :

     पेरणीसाठी फुले उन्नती, फुले आर.एच.आर.जी. 6021, फुले उनप (जे.एल. 286), जे.एल. 501, टी.पी.जी. 41, टी.ए.जी. 24, टी.जी. 26, एस.बी.11 या वाणांपैकी निवड करावी. उपट्या प्रकारच्या वाणांसाठी 40 किलो, मोठ्या दाण्याच्या वाणांसाठी 50 किलो आणि निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी 32 ते 34 किलो प्रति एकरी बियाणे लागते.

भुईमुग बीज प्रक्रिया :

       रोपावस्थेत उद्‌भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रतिकिलो बियाण्यास प्रत्येकी 25 ग्रॅम रायझोबिअम व स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.

भुईमुग पेरणीची योग्य पद्धत :

सपाट वाफा पद्धत

भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर करावयाची झाल्यास 30 सें.मी. अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 30 सें.मी.तर दोन रोपातील अंतर 10 सें.मी.ठेवणे योग्य राहते.पेरणी करताना बी पाच सें.मी. खोलवर टाकावे. नंतर 7 ते 8 दिवसांनी न उगवलेल्या जागी चुका लावून घ्याव्यात.

टोकण पद्धतीचा अवलंब केल्यास बियाण्याची 25 टक्के बचत होते.

पेरणीच्या वेळासुद्धा बारीक बियाणे बाजूला काढणे शक्‍य झाल्यास प्रति हेक्‍टरी साधारणपणे 3.33 लाख रोप मिळतात. 

गादी वाफा (इक्रिसॅट) पद्धत : 

       पूर्व मशागत केलेल्या जमिनीत ट्रॉपिकल्चर या यंत्राने गादी वाफे (रुंद सरीवाफे) तयार करावेत. अशा वाफ्याची जमिनीलगत रुंदी 150 सें.मी., तर वरची रुंदी 120 सें.मी.ठेवावी. वाफ्याची जमिनीपासून उंची 10 ते 15 सें.मी. ठेवावी किंवा 1.5 मीटर अंतरावर 3 सें.मी.च्या नांगराने सऱ्या पाडाव्यात. या पद्धतीत 1.2 मीटर रुंदीचे आणि 15 सें.मी. उंचीचे वाफे तयार होतील. अशाप्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 50 मीटर ठेवावी. हलक्‍या जमिनीत मधल्या दोन सऱ्यांपर्यंत पाणी पोचत नाही. अशा वेळेस 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून गादी वाफे तयार करावेत. अशा वाफ्यावर 30×10 सें.मी.अंतरावर भुईमुगाची टोकण करावी व पाणी द्यावे.

गादी वाफा (इक्रिसॅट) पद्धतीचे फायदे :

गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.

जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते, त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.

पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.

तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते.

या पद्धतीत पाटाने पाणी देता येते.यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही.

भुईमुग तण नियंत्रण :

     भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या 15 ते 20 दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 35 ते 40 दिवसांनंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे, म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल. तणनाशकाचा वापर करून खुरपणी व दोन कोळपण्या दिल्या, तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो. यासाठी पेरणीनंतर 48 तासांच्या ओलीवर,पेंडीमिथॅलिन (30 इसी) 5 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. किंवा पेरणीनंतर 20 दिवसांनी, इमॅझिथापर (10 एसएल) 2 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.भुईमुग तण नियंत्रण

भुईमुग खत व्यवस्थापन :

      3 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति एकर पूर्व मशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते. त्याच बरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते,तसेच जमिनीतील लाभदायक सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते. तसेच शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीकवाढीवर चांगला परिणाम दिसून येतो. पेरणीवेळी 10 किलो नत्र (21 किलो युरिया) 20 किलो स्फुरद (125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट), 20 किलो पालाश (33 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति एकरी द्यावे. भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्‍यक असतात. त्याच बरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. त्यामुळे स्फुरद हे अन्नद्रव्य एस.एस.पी. खतातून द्यावे. पेरणीवेळी 80 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. तर उर्वरित 200 किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, पेरणीवेळी लोह 8 किलो, जस्त 8 किलो व बोरॉन 2 किलो प्रति एकरी द्यावे.संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत व भुईमुग खत व्यवस्थापन  योग्यप्रकारे केल्यास  पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.

सिंचन व्यवस्थापन :

    उन्हाळी भुईमुगाच्या सिचंन व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब फायद्याचे असते.

पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी.वाफसा झाल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा वाळल्यावर लगेच पेरणी करावी. पेरणीनंतर 4-5 दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.

पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा.यादरम्यान जमिनीला भेगा पडणार नाहीत,याची काळजी घ्यावी

फुले येण्याच्या अवस्थेपासून (साधारणतः पेरणीपासून 22 -30 दिवस) ठराविक अंतरानुसार पाणी द्यावे.

आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीनंतर 40-45 दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून 65-70 दिवस) या वेळी पाणी देणे चुकवू नये.

पाण्याचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार ठरवावे.

एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचे भुस व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीमधील अंतर वाढवता येते.

सिचंन व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही,याची कटाक्षाने काळजी घ्यावी. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीत वाफसा राहणे आवश्‍यक आहे.

भुईमुग लागवड

  मित्रांनो “भुईमुग लागवड” संबधीत माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.
 
       सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment