ऋषि पंचमी : व्रत कथा, पूजा महत्त्व, मुहूर्त, पूजा विधी सर्व माहिती Rishi Panchami

 Rishi Panchami  : भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे.भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.ऋषिपंचमीचे व्रताचरण,महत्त्व,मान्यता यांविषयी जाणून घेऊया.

Rishi panchami
Rishi panchami

 

ऋषि पंचमी मराठी माहिती

  सप्तर्षी,अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. महिला उपवास धरतात. ऋषी स्थानी जावून स्नान करून ऋषी पुजन करतात.  बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत, तसेच गाईचे दूध पीत नाहीत.ऋषी प्रमाणे आपल्या परसबागेत भाजी पाला, फळ झाडे लावून त्या भाज्या व फळे खातात.असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात.

  ऋषिपंचमीचे व्रत करताना उपास करायचा असतो पण तुम्ही फळ खाऊ शकता. हिंदू धर्मशास्त्रांत ऋषिपंचमीच्या व्रताचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे. हिंदू धर्मात मासिक पाळीच्या वेळी  महिलांना घरातील एखादं पवित्र कार्य करण्यास मनाई असते.पण समजा महिला देवघर स्वच्च करताना किंवा पवित्र कार्य करतानाच जर तिला पाळी आली तर तिला अपराधी वाटते. वर्षभरात चुकून असे घडले असेल तर त्या महिलेला पापक्षालन करण्यासाठी ऋषीपंचमी हा एकच दिवस असल्याचे मानले गेले आहे. त्या महिलेने सप्तर्षींची पूजा आणि हे व्रत केल्याने तिचं पापहरण होते.

ऋषी पंचमी व्रत  मुहूर्त 

ऋषी पंचमीची तारीख सुरू होते – ३१ ऑगस्ट  दुपारी ०३:२२ वाजता

ऋषी पंचमीची तारीख संपेल – ०१ सप्टेंबर २०२२ दुपारी ०२:४९ वाजता

ऋषी पंचमी २०२२ पूजा मुहूर्त – १ सप्टेंबर २०२२ सकाळी  ११.०५ ते दुपारी ०१. ३७ पर्यंत

ऋषी पंचमी व्रताची कथा

 ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी.आटपाट नगर होते.तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी.

  एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले.बायकोला सांगितले,आज माझ्या आईचं श्राद्ध आहे,खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होते त्यात सर्पानं आपले गरळ टाकले.हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला.

    रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली.बैलानं तिला कारण विचारले. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो.

 आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.

  तेव्हा त्याला ऋषींनी सांगितले,तू ऋषिपंचमीचे व्रत कर ! ते व्रत कसे करावे ? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिले.

 त्या पुण्याने काय झाले ? रजोदोष नाहीसा झाला.आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

सप्तर्षी पूजन मंत्र

कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः।

जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥

दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः॥

  

ऋषीपंचमी व्रत नियम 

•• ऋषींं पंचमीच्या दिवशी आपण प्रामुख्याने सप्त ऋषींं चे तसेच देवी अरूंधतीचे पुजन करावयाचे असते.

•• ह्या दिवशी गायीच्या शेणाने सर्व घर सारवले जाते.

•• ह्यादिवशी आपण कोणाची निंदा करायची नाही तसेच कोणाला वाईट वाटेल असे अपशब्द देखील वापरायचे नसतात.

•• ह्या दिवशी आपण भिक्षुकांना दान करावे त्यांना रिकाम्या हाती पाठवून निराश करू नये. 

•• ऋषीपंचमी च्या दिवशी घरात लसुण तसेच कांदयाचा वापर अजिबात करू नये.

•• ह्या दिवशी साधुसंतांची सेवा करावी.

•• ह्या दिवशी कोणत्याही पक्षी तसेच प्राण्याला त्रास देऊ नये,त्याला मारू नये.

•• ह्या दिवशी आपण फक्त जमिनीतुन पेरून उगवलेल्या धान्याचेच सेवन करायला हवे.

•• ब्राम्हणांना ह्या दिवशी जेऊ घालावे आणि त्यांना दक्षिणा 

ऋषीपंचमी साठी पुजा साहित्य 

>> मातीचा दिवा 

>> केळयाची पाने

>> नारळ 

>> मातीचा कलश

>> पंचामृत 

>> तांदुळ

>> दुध

>> दही

>> तुप 

>> हळद 

>> लवंग

>> विलायची 

>> आंब्याची पाने

>> पीठ

>> कापुर

>>किशमिश

>> काजु 

>> सात प्रकारचे नैवैद्य

>> दहा बदाम 

>> केळी आठ

> गायीचे शेणगो

मुत्र

>गाईचे दूध 

Rishi panchami  puja vidhi marathi

•• ऋषींं पंचमीच्या दिवशी लवकर उठुन एखाद्या नदी तसेच समुद्रात अंघोळ करावी.

•• ह्या नंतर आपले घर गायीच्या शेणाने सारवून घ्यावे.

•• यांतर सप्त ऋषींं आणि देवी अरूंधती यांची प्रतिमा तयार करून घ्यावी.

•• सप्त ऋषींं आणि देवी अरूंधती यांची प्रतिमा तयार करुन झाल्यानंतर कलश स्थापित करायला हवा. 

•• मग सप्त ऋषींंना अंघोळ घालावी आणि त्यानंतर हळद,चंदन आणि फुले,अक्षदांनी त्यांची पुजा करावी.

•• शेवटी मंत्रजाप करून झाल्यावर आणि सप्त ऋषींंची च्या कथेचे श्रवण करावे.मग जमिनीत पेरलेल्या तसेच उगवलेल्या धान्याचे सेवन करावे.

  अशा पदधतीने आज आपण ऋषी पंचमी विषयी सविस्तरपणे सर्व माहीती जाणुन घेतली आहे.आपल्याला ही माहीती कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

टिप :- रील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. 

1 thought on “ऋषि पंचमी : व्रत कथा, पूजा महत्त्व, मुहूर्त, पूजा विधी सर्व माहिती Rishi Panchami”

Leave a Comment